नवी दिल्ली : पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं २०१५ मध्ये रोहतकमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील सात दोषींची शिक्षा कायम केलीय. खालच्या न्यायालयानं सात दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती तीच शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवलीय. हरियाणा राज्य सरकारनं या प्रकरणाची तुलना दिल्लीच्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाशी करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणा सरकारचे वकील दीपक सबरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए बी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं हे प्रकरण 'रेअर ऑफ रेअरेस्ट' असल्याचं सांगत दोषींची संपत्ती जप्त करून ५० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. यातील २५ लाख रुपये मृत तरुणीच्या बहिणीला दिले जातील तर २५ लाख रुपये सरकारी खात्यात जमा करण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत. याबाबत हरियाणा सरकार जुलै महिन्यात अहवाल उच्च न्यायालयासमोर सादर करणार आहे.


काय आहे प्रकरण?


फेब्रुवारी २०१५ मध्ये एका नेपाळी तरुणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर अतिशय घृणास्पदरित्या आणि क्रूरतेनं तिची हत्या करण्यात आली. पीडितेचा मृतदेह पोलिसांना ४ फेब्रुवारी २०१५ रोजी बहु अकबरपूरजवळ शेतात नग्न अवस्थेत सापडलं होतं. 


पोलिसांनी वेगानं हालचाली करत या प्रकरणात नऊ आरोपींना अटक केली. यातील सात दोषींना रोहतक कोर्टानं २१ डिसेंबर २०१५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. रोहतक कोर्टानंही हे प्रकरण 'रेअर ऑफ रेअरेस्ट' मानलं होतं. 


नऊ दोषींपैकी एक आरोपी सोमबीर यानं दिल्लीत फाशी लावून घेत आत्महत्या केली होती. तर आणखीन एक दोषी अल्पवयीन होता. त्याला २०१८ साली तीन वर्षांची शिक्षा सुनावत बालसुधार गृहात धाडण्यात आलं.