Shankaracharya On Row Over Hindus Are Violent Remark: विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये दिलेल्या भाषणावरुन सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केल्याची टीका केली. मात्र ज्योर्ती मठाचे 46 वे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आता थेट राहुल गांधींना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणाला उत्तर देणाऱ्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी भारतीय जनता पार्टीचे नेते लोकांना धार्मिक मुद्द्यावरुन विभाजित करत असल्याचा आरोप केला.


मोदींनी घेतलेला राहुल यांच्या भाषणावर आक्षेप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या भाषणावर संसदेमध्ये आक्षेप घेतला होता. मोदींनी राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेताना, "राहुल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटलं आहे," असा आरोप केला. यावरुन संसदेमध्ये बराच गोंध झाला. त्यामुळे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना दोन्ही बाजूकडील अनेक वक्तव्य सभागृहाच्या कामकाजामधून काढून टाकावी लागली. 


राहुल गांधींचा हल्लाबोल


नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज असं नाहीये. भाजपा म्हणजे संपूर्ण हिंदू समाज असंही नाहीये. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे संपूर्ण हिंदू समाज असंही नाही. हा ठेका भाजपाने घेतलेला नाही, असं राहुल गांधी आपल्या भाषणा म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सभागृहामध्ये विरोधक खासदारांनी समर्थनार्थ घोषणाबाजी केली तर सत्ताधाऱ्यांनी यावर आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. 



शंकराचार्य काय म्हणाले?


हिंदू धर्मामध्ये मानाचं स्थान असलेल्या शंकराचार्यांनी या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करताना राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन केलं आहे. "आम्ही राहुल गांधींचं भाषण काळजीपूर्वक ऐकलं. त्यांनी ठासून असं सांगितलं की हिंदू धर्म हिंसाचाराचा स्वीकार करत नाही," असं शंकराचार्य म्हणाले आहेत. शंकराचार्यांनी राहुल गांधींच्या भाषणामधील ठराविक मुद्द्यावरुन टीका करण्याची भूमिका चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. शंकराचार्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "राहुल गांधींच्या भाषणाचा केवळ ठराविक भाग पकडून त्यावर टीका करणे हे चुकीचं आणि गैरसमज पसरवणारं आहे," असं शंकराचार्यांनी म्हटलं. तसेच अशाप्रकारे गैरसमज पसरवणाऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे असंही शंकराचार्यांनी म्हटलं.


बहिणीनेही केली पाठराखण


राहुल गांधींची बहीण तसेच खासदार प्रियंका गांधी यांनी आपल्या भावाचा बचाव केला आहे. "राहुल कधीच हिंदूंविरुद्ध बोलणार नाही. त्याने केलेली विधानं ही भाजपा आणि त्या पक्षातील नेत्यांसाठी होती," असं प्रियंका यांनी स्पष्ट केलं आहे.