राज्यसभेत टेबलावर चढून विरोधी खासदारांचा गोंधळ, होऊ शकते मोठी कारवाई
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेत सभागृहात टेबलवर चढून गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा होऊ शकते. अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू हे आता कारवाई करू शकतात.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Parliament Monsoon Session) राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. मंगळवारी विरोधी खासदारांनी हद्दच केली. राज्यसभेत जोरदार गोंधळ घालत विरोधी खासदारांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. टेबलवर चढून काही खासदारांनी गोंधळ घातला. या गोंधळी खासदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
गोंधळी खासदारांवर कारवाई होऊ शकते
राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांनी गोंधळ घालणाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेत विरोधी खासदारांकडून पुस्तक फेकणे योग्य नाही. पुस्तक अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने फेकणाऱ्या विरोधी खासदारांवर सभापती व्यंकय्या नायडू कारवाई करू शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पीयूष गोयल आणि इतर भाजप खासदारांनी आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि याबाबत चर्चा केली.
मर्यादा मोडणे म्हणजे अराजकता : नक्वी
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी Mukhtar Abbas Naqvi) म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नावाने प्रतिष्ठा किंवा मर्यादा मोडणे म्हणजे अराजकता आहे. त्याचवेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहातील विरोधकांचा गोंधळ हा संसदीय आणि मर्यादा ओलांडणारा असल्याचे म्हटले आहे. सभागृहाचे पावित्र जपलेले नाही. त्यांनी हद्दच पार केली आहे. सभागृहाच्या नियमांची पायमल्ली केली आहे. हा सभागृहाचा मोठा अवमान आहे.
सुमारे दीड तास हा गोंधळ सुरूच
राज्यसभेत विरोधी खासदारांचा गोंधळ सुमारे दीड तास सुरू राहिला. नंतर, मार्शलांनी गोंधळ घालणाऱ्या या खासदारांना सभागृहाबाहेर काढले आणि त्यानंतर राज्य सभेच्या सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. मात्र, सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर या सदस्यांनी पुन्हा टेबलवर चढून गोंधळ सुरू केला. विरोधी पक्षाचे अनेक सदस्य निषेध करण्यासाठी काळे कपडे आणि काळे मास्क घालून सभागृहात आले होते.