भोपाळ : काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आरएसएसवर केलेली टीका संघाला चांगलीच झोंबलीय. संघात महिलांना स्थान का नाही? असा प्रश्न राहुल गांधी उपस्थित केला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान का नाही? या प्रश्नावर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी राहुल गांधींना प्रत्यूत्तर दिलंय. ते भोपाळमध्ये बोलत होते.


'महिला हॉकी मॅच पाहा...'


'राहुल गांधींची स्क्रिप्ट लिहिणारे समजूतदार नाहीत... हे तर असं झालं की पुरुषांच्या हॉकी मॅचमध्ये महिला खेळाडू शोधतायत...  राहुल गांधींनी संघाची सोडून आपल्या पक्षाची चिंता करावी...' असं त्यांनी म्हटलंय. संघात महिला का नाहीत? या प्रश्नाला सामोरं जाताना त्यांनी म्हटलं, 'संघानं निर्णय घेतला होता की संघटना केवळ पुरुषांसोबत काम करेल, याचा निर्णय घेण्याचा अधिकार संघाला आहे... जर राहुल गांधींना महिलांना शॉर्टसमध्ये पाहायचंय तर त्यांनी महिला हॉकी मॅच पाहावी...'


काय म्हटलं होतं राहुल गांधींनी...


राहुल गांधींनी आपल्या गुजरात दौऱ्यात संघावर जोरदार हल्ला करत महिलासक्षमीकरणाच्या बढाया मारणाऱ्या संघात महिलांना मात्र प्रवेश नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली होती. 'संघात किती महिला आहेत? तुम्ही कधी महिलांना संघाच्या शाखेत पाहिलंय शॉर्टसमध्ये? मी तर नाही पाहिल्यात... आरएसएसमध्ये तुम्हाला एक महिला दिसत नाही... माहीत नाही काय चूक केलीय महिलांनी की त्या संघात प्रवेश करू शकत नाहीत' असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.