मुंबई : अजून बऱ्याच जणांचं नवीन आर्थिक वर्षाचं नियोजन बाकी आहे. अशावेळी तुमच्यासाठी दीर्घकाळ गुंतवणुकीच्या हिशोबानं पब्लिक प्रोव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ (PPF) एक चांगला आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. या गुंतवणुकीवर सर्वात जास्त परतावा मिळतो. तसंच बाजाराच्या चढ-उतारावर हा परतावा अवलंबून नसल्यानं त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. त्याशिवाय या गुंतवणुकीमुळे तुम्हाला ठराविक वर्षात आयकरात सूटही मिळते. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला पीपीएफ अकाऊंट उघडता येऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेत पीपीएफ अकाऊंट उघडलं तर त्याचे काय काय फायदे मिळतात? व्याज किती मिळतं? किंवा पीपीएफ अकाऊंटमध्ये पैसे भरायला तुम्ही विसरलात तर काय कराल? हे आपण आज जाणून घेणार आहोत.


जास्तीत जास्त दीड लाख


पीपीएफ अकाऊंटमध्ये एका आर्थिक वर्षात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त पैसे या अकाऊंटमध्ये गुंतवले तर त्यावर तुम्हाला व्याज किंवा आयकरात सूट मिळणार नाही. ही गुंतवणूक तुम्ही वर्षातून एकदा किंवा प्रत्येक महिन्यालाही करू (वर्षातून १२ वेळा) शकता.


कसं मिळतं व्याज?


तुमच्या पीपीएफवर किती व्याज मिळेल? याचा निर्णय आरबीआय प्रत्येक तीन महिन्याला घेते. पीपीएफवर सध्या ८ टक्के दरानं व्याज दिलं जातं. पीपीएफ अकाऊंटमध्ये ५ तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ज्या दिवशी सर्वात कमी बॅलन्स असेल, त्यावर व्याजाचा हिशोब केला जातो. प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च रोजी पेमेंट केलं जातं.


दीर्घकालीन गुंतवणूक


पीपीएफ अकाऊंट १५ वर्षांसाठी उघडलं जातं. त्यानंतर तुम्ही त्याला आणखी पाच वर्षांपर्यंत वाढवू शकता. पहिली पाच वर्ष तुम्ही आपल्या पीपीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकत नाहीत. त्यानंतर मात्र काही महत्त्वाच्या कारणांसाठी तुम्ही हे पैसे काढू शकता.


खंड पडला तर...


प्रत्येक आर्थिक वर्षाला पीपीएफ खात्यात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये भरण्यास असमर्थ ठरलात किंवा विसरलात तर हे खातं बंद पडतं. परंतु, ते तुम्हाला पुन्हा सुरूही करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक लेखी अर्ज द्यावा लागेल. त्यानंतर खंड पडलेल्या प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये प्रमाणे दंड तसंच ५०० रुपये त्या वर्षांची बाकी रक्कम आणि चालू वर्षासाठी ५०० रुपये भरून तुम्हाला हे खातं पुन्हा सुरु करता येऊ शकतं.