मी संशयित दहशतवाद्याला उमेदवारी दिली तर चालेल का? मेहबुबा मुफ्तींचा भाजपला सवाल
भोपाळ मतदारसंघाकडे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
श्रीनगर: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रजा सिंह ठाकूर यांच्या भाजप प्रवेशावरून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारला धारेवर धरले आहे. जर मी एखाद्या संशयित दहशतवाद्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर चालेल का, असा सवालही मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारला विचारला. साध्वी प्रज्ञा यांनी बुधवारी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना भोपाळ मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे भोपाळ मतदारसंघाकडे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. जर मी एखाद्या संशयित दहशतवाद्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असते तर देशभरात किती क्षोभ उसळला असता याची कल्पना करा. प्रसारमाध्यमांनी #mehboobaterrorist असे हॅशटॅग वापरून बातम्या चालवल्या असत्या. जेव्हा हिंदू दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा यांच्याकडून दहशतवादाला धर्म नसतो असे सांगितले जाते. एरवी सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवले जाते. निर्दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येकजण आरोपीच असतो, असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
साध्वी प्रज्ञा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हटले की, भोपाळमध्ये धर्माचा विजय व अधर्माचा नाश होईल. या निवडणुकीत भगवा आणि विकास हे दोन प्रमुख मुद्दे असतील. मी भोपाळमधून बहुमताने निवडून येईल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते.