संभाजी भिडेंना दिलासा; न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर
माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते.
नाशिक: माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते, असे वक्तव्य करून वाद ओढावून घेणारे श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना शुक्रवारी न्यायालयाने दिलासा दिला. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका व्याख्यानात संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे विधान केले होते. यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच हे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणार असल्याचे सांगत भिडे यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हाही दाखल झाला होता. यानंतर संभाजी भिडे यांना नाशिक पोलिसांकडून हजर राहण्यासाठी वॉरंट बजावले होते. मात्र, भिडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भिडे यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता होती. परंतु, आज त्यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात येऊन आपली बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने भिडे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबरला होईल.
संभाजी भिडे यांच्या अजब दाव्यामुळे त्यावेळी राज्यात मोठी खळबळ उडाली होती. माझ्या शेतातील आंबे खाऊन तब्बल १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली. लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुले होतं नाहीत. अशा स्त्री-पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुले होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना जोडप्यांना हे फळ खायला दिले असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत, असे भिडे यांनी सांगितले होते.