COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पणजी : सृष्टीत चैतन्याचा बहर आणणारा मान्सून म्हणजे जणू उत्साह पर्वचं... या मान्सूनची रंगत गोव्यात अनोख्या पद्धतीनं साजरी होते. डोक्यावर फुलांचा मुकूट चढवून, अंगावर वेलींचा साज लेऊन पाण्यात डुबकी मारणारी मंडळी, संगीत नृत्यांचा जंगी लवाजमा अशा थाटात गोव्यात सांजाव उत्सवानं चैतन्याचे रंग भरले. या महोत्सवाचा पर्यटकांनीही आनंद लुटला. यंदा पावसानेही हजेरी लावल्याने सांजावचा आनंद द्विगुणित झालाय.


गोव्याची जीवनशैली कायमच आपलं वेगळेपण जपत आली आहे. इथलं मान्सून सेलिब्रेशनही असचं अनोखं. मान्सूनच्या आगमनाबरोबरच गोव्याच्या हवेत सांजावचे रंग भरु लागतात. एकीकडे अवीट कोकणी गीतांचा ताल, तर दुसरीकडे नवं विवाहित जोडप्यांना पानाफुलांचा काटेरी मुकूट घालून वैवाहिक आयुष्याच्या शुभकामनेसाठी गावच्या विहिरीत डुबकी मारायला लावली जाते. ही सांजावची मूळ संकल्पना. सांजावच्या परंपरेत नव्या पिढीचा उत्साहही जोडला जातो आहे. गोव्यात ठिकठिकाणी सांजावच्या निमित्तानं भव्यदिव्य कार्यक्रमांची रेलचेल असते.