नवी दिल्ली : एका बाजुला सत्तास्थापनेचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल सुरू आहे. भाजपनं शिवसेनेसारखा मोठा मित्र पक्ष गमावला असून भाजपच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातून होणार असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. यावेळी राऊतांनी मोदींचा दाखला देत भाजपच्या इतर नेत्यांनीही पवार काय आहेत ते समजून घ्यावं असा टोला लगावलाय. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार बनेल आणि ते स्थिर असेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजपानं सर्वात मोठा मित्र गमावलाय. याची किंमत भाजपाला मोजावी लागेल' असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. 'भाजपाला शिवसेनेनंच मोठं केलं... आणि आता भाजपाच्या अंताची सुरुवात महाराष्ट्रातून होतेय' अशी तिखट प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिलीय. सोबतच शरद पवार यांना समजून घेण्यासाठी १०० वर्ष लागतील, असंही वक्तव्य त्यांनी केलं. संजय राऊत आज दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. याच वेळी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 


'पवारांना समजून घ्यायला १०० वर्ष लागतील'


शरद पवार यांच्याबद्दल बोलताना, शरद पवार हे देशाचे अनुभवी नेते आहेत. पवारांना समजून घ्यायला १०० वर्ष लागतील, असं राऊत यांनी म्हटलंय. 'शरद पवार यांची खरी लढाई भाजपाशी आहे... मोदींच्या वक्तव्यातून भाजपानं शिकावं, 'मोदींनीच पवार आपले गुरू असल्याचं' म्हटलं होतं... 



शेतकरी प्रश्नांवर शिवसेना कायमच आक्रमक राहिली आहे... आणि हीच भूमिका पुढेही कायम राहील, असं म्हणत अधिवेशनात शिवसेनेची काय भूमिका असेल याचं सूतोवाच संजय राऊत यांनी केलंय. 'ज्यांच्या मेंदूत गोंधळ तेच गोंधळी आहेत... सेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही' असं म्हणत राऊत यांनी 'महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार स्थापन होणार' असा विश्वास व्यक्त केलाय.