Adani Group ला SBI ने दिलं 27000 कोटींचं कर्ज; SBI चे चेअरमन म्हणाले, `अदानी ग्रुपला कर्ज देताना...`
SBI overall exposure to Adani Group: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमनने यासंदर्भातील आकडेवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जाहीर केली.
SBI overall exposure to Adani Group: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकने म्हणजेच 'एसबीआय'ने (SBI) शुक्रवारी अदानी ग्रुपसंदर्भात (Adani Group) मोठा खुलासा केला आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांना 'एसबीआय'ने 27,000 कोटींचं कर्ज दिलं आहे. हे कर्ज बँकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या 0.88 टक्के असल्याचं 'एसबीआय'ने म्हटलं आहे. 'एसबीआय'चे चेअरमन दिनेश खारा यांनी अदानी ग्रुपने घेतलेलं कर्ज फेडण्यात त्यांना काही आव्हानांचा समाना करावा लागेल असं बँकेला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच बँकेने शेअर्जच्या मोबदल्यात अदानी ग्रुपला कोणत्याही प्रकारचं कर्ज दिलेलं नाही, असंही खारा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा >> RBI on Adani: देशातील बँकांना Adani Hindenburg प्रकरणाचा बसणार फटका? RBI ने केला खुलासा
काय म्हणाले SBI चे चेअरमन?
खारा यांनी दिलेल्या माहितीनुसार अदानी ग्रुपच्या कंपन्यांना कर्ज देताना स्थावर मालमत्ता आणि आर्थिक स्थितीचा विचार करण्यात आला होता. कर्ज फेडण्यासंदर्भातील अदानी ग्रुपची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक असल्याचंही खारा यांनी सांगितलं. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पडझड झाल्याचं दिसून आलं. मात्र कर्ज पुनर्वित्त करण्याचा कोणताही अर्ज अदानी समुहाकडून आलेला नाही असंही खारा यांनी स्पष्ट केलं.
कर्ज फेडण्यात कोणतंही आव्हान नाही
मागील गुरुवारी अमेरिकेतील (America) शॉर्ट सेलिंग फर्म असलेल्या हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) जारी केलेल्या एका अहवालामध्ये एसबीआयने अदानी समुहातील कंपन्यांना 21,000 कोटींचं कर्ज दिल्याचं म्हटलं होतं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार जेवढं कर्ज देण्याची परवानगी आहे त्याच्या ही अर्धी रक्कम आहे. सध्या या अहवालामुळे चर्चेत असलेला अदानी ग्रुप कर्ज योग्य पद्धतीने फेडत असल्याचं खारा यांनी म्हटलं आहे. बँकेने जेवढं कर्ज दिलं आहे त्याच्या वसुलीमध्ये सध्या तरी कोणतंही आव्हान बँकेला दिसत नसल्याचं 'एसबीआय'चे चेअरमन म्हणाले. ब्लूमबर्गने एका सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. देशातील केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अदानी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामधील बँकिंग सेक्टर फार मजबूत आणि स्थिर आहे असं 'आरबीआय'ने म्हटलं आहे.