आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.
नवी दिल्ली : आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही कधीही आधार कार्ड बॅंक खाते किंवा मोबाईल क्रमांकाला लिंक करु शकता. पुढील निर्णय येईपर्यंत आधार कार्ड सक्ती नाही.
आधार सक्तीपासून सुटका
सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची सक्ती करता येणार नाही, असा निर्णय दिलाय. त्यामुळे आधार सक्तीपासून सुटका झाली आहे. ३१ मार्चची मुदत त्यामुळे रद्द झालेय. बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
३१ मार्चची मुदत रद्द
येत्या ३१ मार्चपर्यंत बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत होती. सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी होती. त्यावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ही मुदतवाढ दिलेय. सरकार याप्रकरणी कोणावरही शक्ती करू शकत नाही, असे मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी निकाल देताना व्यक्त केले.
खासगीपणाचा हा मूलभूत अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व योजना आणि अन्य बाबींसाठी लागू असेल. खासगीपणाचा हा घटनात्मकदृष्ट्या नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय घटनापीठने दिला होता.
अनेक याचिका दाखल
त्यानंतर आधारमुळे या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या. त्यापैकी काही याचिकाकर्त्यांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) अर्थात आधार क्रमांक बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाशी जोडणे घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते.
लाखो लोकांना दिलासा
यापूर्वी ६ फेब्रुवारी २०१८ या तारखेवरून ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार जोडण्यास मुदत वाढवली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा मुदत वाढ देऊन देशातील लाखो लोकांना दिलासा दिला आहे.