नवी दिल्ली : जगभरात बंदी असणारी किटकनाशकं वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. जगभरात बंदी असलेली कीटकनाशक का वापरली जातात असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारला असून याबाबत ६ आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात ९३ प्रकारच्या कीटकनाशकावर बंदी आहे. परंतु भारतात या ९३ प्रकारच्या कीटकनाशकांवर बंदी का नाही? काही कीटकनाशक औषधांवर भारतात बंदी आहे. परंतु तरीही सर्रास विक्री केली जाते. यावर केंद्र सरकारचं नियंत्रण नसल्याचं याचिकाकर्ता वकील प्रशांत भूषण यांनी म्हटलंय. अशा प्रकारच्या फवारणी औषाधामुळे घातक रसायन अन्नामध्ये प्रवेश करत असून धान्य उत्पादनही कमी होत असून कीटकनाशकांसंदर्भात सरकारनं धोरण आखावं, असंही प्रशांत भूषण यांनी म्हटलंय. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये किटकनाशक फवारणी करताना अनेक शेतक-यांचे प्राण गेले असून अनेकजण गंभीर आहेत. अशात आता सरकार कोर्टाच्या या नोटीसला काय उत्तर देतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.