CORONA: वाढत्या संसर्गामुळे अनेक राज्यात शाळा-कॉलेज बंद, परीक्षा ही पुढे ढकलल्या
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा झपाट्याने संसर्ग
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्रासह देशातील काही ठिकाणी मर्यादित लॉकडाऊन आणि रात्रीच्या वेळी कर्फ्यूसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बर्याच दिवसानंतर पुन्हा खुल्या शाळा बंद होऊ लागल्या आहेत. गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्रात बऱ्याच भागात पुन्हा शाळा महाविद्यालये बंद झाली आहेत. पंजाबमधील बोर्डाच्या परीक्षा एका महिन्यासाठी तहकूब करण्यात आल्या आहेत. तर देशातील बर्याच भागात शाळा खुल्या आहेत.
महाराष्ट्रात संसर्ग वाढला
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग पुन्हा एकदा भयानक रुप घेत आहे. राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व नाट्यगृहे आणि सभागृह 50 टक्के क्षमतेसह चालविण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क शिवाय प्रवेश करण्यास परवानगी देणार नाहीत. सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील. पुण्यातील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातही शाळा महाविद्यालय बंद
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि खाजगी शाळा पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. निवासी शाळा (आश्रम शाळा) व नांदोर येथील शिक्षकासह 30 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे पुढे आल्यानंतर वसतिगृह सील केले गेले होते. मुंबईतील सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे.
गुजरातमध्ये काही शहरातील शाळा महाविद्यालये बंद
गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, जामनगर, भावनगर गांधीनगर या आठ महानगरपालिकांमधील शाळा महाविद्यालये 10 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट येथे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू कालावधी वाढविला आहे.
मध्य प्रदेशमध्ये ही परीक्षा पुढे ढकलल्या
मध्य प्रदेशमध्ये प्रोफेशनल परीक्षा बोर्डाने मध्य प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल केडर भर्ती परीक्षा पुढे ढकलली आहे. मध्य प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल संवर्ग भरती परीक्षा 06 एप्रिल 2021 पासून सुरू होणार होती. मध्य प्रदेश सरकारने 20 मार्च ते 31 मार्च दरम्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान आंतरराज्यीय बससेवा तात्पुरती बंद केली आहे.
पंजाबमध्येही परीक्षा पुढे ढकलल्या
पंजाबमधील सर्व शाळा प्री नर्सरीपासून ते बारावीपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. एवढेच नव्हे तर पुढील आदेश होईपर्यंत सर्व अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. पंजाब स्कूल एज्युकेशन बोर्डाने कोरोना साथीच्या आजारामुळे बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली आहे. 12 वीची परीक्षा 22 मार्च ते 20 एप्रिल ते 24 मे या कालावधीत होणार आहे.