नवी दिल्ली : चीनमधील (china) भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी गेलेलं एअर इंडियाचं (AIR INDIA) दुसरं विमानही आज मायदेशी परतलं आहे. या विमानातून ३२३ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलंय. या विमानात ७ मालदिवच्या रहिवाशांचाही समावेश आहे. दरम्यान चीनमधल्या वुहानमध्ये कोरोनाचा धुमाकुळ सुरुच आहे. आतापर्यंत कोरोनाने ३०० हून अधिक नागरिकांचा बळी घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारने चीनमधून येणाऱ्या सर्व भारतीयांना दिल्लीतील छावला आणि हरियाणातील मानेसर आरोग्य शिबिरात राहण्याची सोय केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधून परतलेल्या या सर्व लोकांना उर्वरित भारतीय नागरिकांपासून किमान दोन आठवड्यांपर्यंत दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


भारत सरकारच्या या निर्णयाअंतर्गत, चीनहून परत आलेल्या सर्व भारतीयांना इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) दिल्ली बाहेरील छावला येथे आणि हरियाणाच्या मानेसर येथील इंडियन आर्म फोर्स मेडिकल सर्विसेजच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे.



कोरोना व्हायरसचा संसर्ग चीनच्या वुहानमध्ये सर्वाधिक पसरला आहे. वुहानमधून कोरोना व्हायरस चीनच्या ३० विविध राज्यांमध्ये पसरला आहे. वुहानमध्येच अधिकतर भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. शनिवारी मायदेशी परतलेल्या अधिकांश भारतीयांमध्ये सर्वाधिक संख्या विद्यार्थ्यांची आहे.


चीनमधून आलेल्या भारतीयांना दिल्ली आणि हरियाणामधील छावण्यांमध्ये नेण्यापूर्वी सर्व भारतीयांची चाचणी प्रथम चीनमध्ये आणि नंतर दिल्ली विमानतळावर केली गेली. यावेळी थर्मल स्क्रीनिंगसह सखोल तपासणी करण्यात आली. यानंतर चीनमधून परत आलेल्या या सर्व भारतीयांना खास वाहनांनी छावला आणि मानेसर येथे नेण्यात आले.



तर दुसरीकडे, केरळमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे. चाचण्यांअंती त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी चीनला जाऊन आलेली. त्यानंतर आता या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.