मुंबई : अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणी प्रदीर्घ चाललेल्या खटल्याचा शनिवारी निकाल लागत आहे. सर्वोच्च न्यायालय शनिवारी सकाळी आज सकाळी साडे दहा वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, दिल्लीसह बऱ्याच ठिकाणांना छावणीचं स्वरुप आलं आहे. शिवाय राज्यातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकालाच्या धर्तीवर अयोध्या आणि जम्मू काश्मीर येथे कलम १४४ लागू करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निकालानंतर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ४ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. तर, उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. येथील बऱ्याच ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.


सध्याच्या घडीला देशातील काही राज्यांमध्ये विशेषत: पोलिसांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त सुरक्षा दलांनाही पाचारण करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व धार्मिक स्थळांवर पोलिसांची करडी नजर असणार ठेवण्यात येणार असून, सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  




काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन 


अयोध्या राम जन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, सोबतच राज्यात शांतता आणि सलोखा कायम राखण्यात मदत करावी असं सांगत त्यांनी सलोखा राखणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणून  दिली. 



कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशा प्रकारे अभिव्यक्ती असावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.