पिस्तुलसोबत सेल्फी महागात, गोळी डोक्यातून आरपार
दिल्लीतील विजय विहार परिसरात पिस्तुलसोबत सेल्फी घेताना एकाचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली : दिल्लीतील विजय विहार परिसरात पिस्तुलसोबत सेल्फी घेताना एकाचा मृत्यू झाला. काल रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दिल्लीत सेल्फीचे भयंकर रुपसमोर आले आहे.
अशी सुटली गोळी...आणि आरपार गेली
राजस्थानहून दिल्लीत आपल्या काकांच्या येथे कामानिमित्त राहण्यास विजय आला होता. काकांच्या घरात परवाना असलेली पिस्तुल होती. या पिस्तुलसोबत विजय सेल्फी घेत होता, अचानक गोळी सुटली आणि विजयच्या डोक्याचा वेध घेत आरपार गेली. या घटनेत विजयचा मृत्यू झाला. या घटनेवेळी छोटू नावाचा एक व्यक्ती त्याच्या सोबत असल्याचं सांगण्यात येत आहे.
शेजारच्या छोटू नामक तरुणावर हत्येचा आरोप
मात्र विजयचे नातेवाईक शेजारच्या छोटू नामक तरुणावर हत्येचा आरोप करत आहेत. सोबत सेल्फी घेताना शेजारील छोटू नामक तरुणही उपस्थित होता. त्यामुळे छोटूने विजयची हत्या केल्याचा आरोप विजयचे नातेवाईक करीत आहेत.
विजय, छोटू दोघेही पिस्तुलसोबत घेत होते सेल्फी
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विजय आणि छोटू दोघेही पिस्तुलसोबत सेल्फी घेत होते. त्यावेळी अचानक गोळी सुटून विजयच्या डोक्यातून आरपार गेली. मात्र पोलिसांच्या या अंदाजाला विजयच्या नातेवाईकांनी फेटाळले आहे. दरम्यान, विजयच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही फोटो सापडले. या फोटोंमध्ये विजयच्या हातात पिस्तुल असल्याचे दिसते आहे.
मात्र या घटनेमुळे सेल्फीचं वेड किती भयानक असतं, हे समोर आलं आहे. विजयच्या मृत्यूमागे आणखी दुसरं कोणतं कारण तर नाही ना याचा शोध पोलीस घेत आहेत.