नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी येथील प्रिमास रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जात. मुंबईमध्ये काँग्रेसची उभारणी करण्यात कामत यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेसमधले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे.  काँग्रेसच्या सर्व पदांचा राजनीमा देत त्यांनी स्वत:ला कार्यमुक्त केले होते.


 विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९७२च्या सुमारास विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केलेल्या कामथ यांची नाळ काँग्रेस पक्षाशी जुळली. काँग्रेसनेही त्यांच्यावर वेळोवेळी विश्वास दाखवत विविध आणि महत्त्वपूर्ण पदांची जाबाबदारी सोपवली. आपल्या एकूण राजकीय कारकिर्दीतील बराच कालावधी त्यांनी लोकसभेवर प्रतिनिधीत्व केले. १९८४मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. यूपीए सरकारच्या काळाता (२००९ ते २०११) राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. मात्र, २०१४ मध्य़े झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेत शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून त्यांचा पराभव झाला.


 काँग्रेसच्या सर्वपदांचा राजीनामा देऊन कार्यमूक्त राहण्याचा निर्णय


दरम्यान, अलिकडील काही वर्षांत मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला उधान आले होते. त्यातच कामत यांचे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले. या वादातून त्यांनी काँग्रेसच्या सर्वपदांचा राजीनामा देऊन कार्यमूक्त राहण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये त्यांची विशेष ताकद होती.