आगरतळा: रोजगार निर्मितीसाठी मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा गोपालनाचा व्यवसाय अधिक फायदेशीर असल्याचे मत त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी मांडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिपुरातील भाजप सरकारने राज्यातील ५००० कुटुंबांना रोजगार म्हणून गायींचे वाटप करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना बिप्लब देव यांनी म्हटले की, रोजगार निर्मितीसाठी मोठे उद्योगधंदे उभारायचे झाल्यास जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक करावी लागते. यामधून फारतर २००० लोकांनाच रोजगार मिळू शकतो. याउलट ५००० कुटुंबांना १० हजार गायी दिल्या तर अवघ्या सहा महिन्यांत त्यांना उत्पन्न मिळायला सुरुवात होते, असे बिप्लब देव यांनी म्हटले. 


यावेळी बिप्लब देव यांनी आपल्या सरकारी निवासस्थानीही गोपालन करण्याचा मानस जाहीर केला. जेणेकरुन गोपालनासाठी अधिकाअधिक लोक उद्युक्त केला. 


काही महिन्यांपूर्वीच बिप्लब देव यांनी पदवीधर तरुणांना घरी बसण्यापेक्षा गोपालन सुरु करण्याचा सल्ला दिला होता. प्रत्येक घरात गाय असलीच पाहिजे. बेरोजगार तरूणांनी नोकऱ्यांच्या शोधात भटकण्यापेक्षा गोपालनाचा व्यवसाय केला असता तर आज त्यांच्याकडे बराच पैसा असता, असे बिप्लब देव यांनी सांगितले होते.