गुरूग्राममध्ये इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू
गुरूग्राममध्ये काल गुरूवारी कोसळलेल्या इमारत दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : गुरूग्राममधील उलावास भागात गुरूवारी सकाळी चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. यात ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्यातील चार कामगारांची ओळख पटली आहे. गुरूवारी सकाळपासून २४ तास चाललेले बचावकार्य शुक्रवारी सकाळी थांबवण्यात करण्यात आले. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
मृत कुलदीप (३२), विशाल (१७), अल्ताफ (२४) उत्तरप्रदेशमधील आंबेडकर नगर जिल्ह्यातील तर आनंद (२२) हा बिहारचा रहिवासी होता. गुरूवारी सकाळी ४ च्या सुमाराम इमारत कोसळली. त्यानंतर एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे जवान, एसडीआरएफ तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली होती.
इमारतीच्या वरच्या मजल्यावरील छत कोसळल्याने संपूर्ण इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इमारत कोसळली त्यावेळी कामगार दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर काम करत होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.