सात वर्षांच्या मुलाने बिबट्याच्या तावडीतून केली मित्राची सुटका !
गीर सोमनाथमधील अराथिया गावात राहणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलाने युक्ती वापरून बिबट्याच्या तावडीतून आपल्या मित्राची सुखरूप सुटका केली.
मुंबई : गीर सोमनाथमधील अराथिया गावात राहणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलाने युक्ती वापरून बिबट्याच्या तावडीतून आपल्या मित्राची सुखरूप सुटका केली. जयराज गोहेल असं या धाडसी मुलाचं नाव आहे. त्याचा निलेश नावाचा मित्र बिबट्याच्या तावडीत सापडला होता. पण या चिमुरड्याने युक्तीच्या जोरावर आपल्या मित्राला वाचवलं.
जयराज आणि नीलेश दोघंही आपल्या घराजवळ खेळत होते. यावेळी झुडूपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नीलेशवर हल्ला केला. नीलेश प्रतिकार करू शकत नव्हता. बिबट्याने त्याला फरफटत जंगलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मित्राला वाचवण्यासाठी जयराजनं वाघाच्या दिशेने दगड फेकले पण यातून काहीच साध्य झालं नाही. शक्तिशाली बिबट्याच्या तावडीतून आपल्या मित्राला वाचवणं अवघड असल्याचं लक्षात येताच छोट्या जयराजनं शक्कल लढवली. त्याने आपल्या हातातलं इलेक्ट्रॉनिक खेळणं बिबट्याच्या दिशेनं फेकलं. खेळण्यातून निघालेल्या कर्कश आवाजाला घाबरून बिबट्याने निलेशला तिथेच सोडलं आणि जंगलात पळ काढला.
जयराजच्या युक्तीमुळे निलेश थोडक्यात बचावला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे निलेशच्या अंगावर जखमा झाल्या. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.