Maharashtra Politics : `तर विरोधी बाकावर बसू` पाहा असं का म्हणाले शरद पवार
महाराष्ट्रातल्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण वेगवान घडामोडी सुरु आहेत. एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं असून महाविकास आघाडीच्या तिनही पक्षांच्या बैठका सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार ठिक चाललं आहे, महाराष्ट्रात असं तिसऱ्यांदा घडतंय, सरकार स्थापनेपूर्वीही असं घडलं होतं, आताही चर्चेतून तोडगा निघेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात आता जी परिस्थिती सुरु आहे त्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तीन पक्षांमध्ये जो करार आहे त्यानुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आता कोणाला काय भूमिका द्यायची हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही राहणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे सरकार सुरु आहे त्यात काही बदल करावा असं आम्हाला वाटत नाही, एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार असल्याच्या वृत्तावर बोलताना कोण कोणाला भेटतायत यात आम्ही काहीही करु शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग झाल्याबद्दलही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक म्हटलं की क्रॉस व्होटिंग होत असते, गेल्या पन्नास वर्षात अनेकवेळा क्रॉस व्होटिंग झाल्याचं पाहिला मिळालं आहे. पण आघाडीत जराही मतभेद नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
सरकार कोसळल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार का या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी हसत सेन्सिबल प्रश्न विचारा असं उत्तर दिलं. तसंच अशी वेळ आली तर विरोधी बाकावर बसू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.