Sharad Pawar Gautam Adani Meet: अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani Meet) यांनी गुरुवारी (1 जून 2023 रोजी) रात्री अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं होतं. यापूर्वी पवार आणि अदानी यांनी एप्रिल महिन्यात एकमेकांची भेट घेतली होती. मात्र गुरुवारी रात्री अचानक मुंबईतील या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी नेमकी ही भेट का झाली यासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. 


पवार काय म्हणाले भेटीबद्दल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच शरद पवारांनी या भेटीसंदर्भात खुलासा केला आहे. ही भेट टेक्निकल मुद्द्यांवर होती असं पवारांनी म्हटलं आहे. सिंगापुरचं एक प्रतिनिधीमंडळ माझ्याकडे आलं होतं. काही तांत्रिक मुद्द्यांसंदर्भात त्यांना गौतम अदानींना भेटायचं होतं, असं पवार यांनी सांगितलं. याच भेटीसाठी अदानी 'सिल्व्हर ओक'वर गेले होते. ही भेट पूर्णपणे तांत्रिक कारणांसाठी होती असं पवारांनी स्पष्ट केलं. मला यासंदर्भात फारशी माहिती नाही असंही पवारांनी सांगितलं. 


हिंडनबर्ग प्रकरणामध्ये पवारांनी घेतली अदानींची बाजू


शरद पवार आणि अदानी यांच्यामधील ही बैठक जवळजवळ अर्धा तास सुरु होती. पवारांनी या बैठकीला तांत्रिक बैठक असलं म्हटलं असलं तरी या भेटीचे वेगळे अर्थ काढणं सुरु आहे. यापूर्वीच पवारांनी हिंडनबर्ग अहवालासंदर्भात बोलताना अदानींची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं होतं. अमेरिकेतील हिंडनबर्ग या वित्तीय व्यवहारांसंदर्भातील कंपनीने अदानी समुहावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप केले होते. यामुळे अदानी समुहाचे शेअर्स बरेच पडले होते. अदानी समुहाला या सर्व प्रकरणामुळे हजारो कोटींचं नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या प्रकरणावरुन थेट संसदेमध्ये सत्ताधारी विरुद्ध काँग्रेस असा संघर्षही पहायला मिळाला होता.


पवार काय म्हणाले होते?


काँग्रेसने हिंडनबर्ग प्रकरण चांगलेच उचलून धरले होते. मात्र या प्रकरणासंदर्भात बोलताना शरद पवारांनी एका मुलाखतीत अदानी समुहाची बाजू घेतली होती. हिंडनबर्गचा उल्लेख करत पवारांनी एका मुलाखतीत, "यापूर्वीही या व्यक्तीने अशी विधानं केल्याने संसदेमध्ये गोंधळ झाला होता. मात्र यावेळेस या मुद्द्याला फार महत्त्व देण्यात आलं. जो अहवाल समोर आला त्यामध्ये कोण आणि काय बोललं आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे याचा विचार करायला हवा. अशा प्रकरणांमुळे देशात मोठा वाद निर्माण होतो ज्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. हे सर्व काही हेतूपुरस्कृत करण्यात आलं आहे असं वाटतं," असं म्हटलं होतं.