COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : 'शरद पवारच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे. २०१९ साली बहुमतात आलो, तर पंतप्रधान होईन, असं राहुल गांधी यांनी म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं लगेचच ही भूमिका घेतली आहे. राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू शकतात, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीनं दिली आहे. राष्ट्रवादीने ही खोचक प्रतिक्रिया दिली असली, तरी राष्ट्रवादीच्या जागा प्रत्येक लोकसभा निवडणुकीला कमी कमी होत जात आहेत, त्यानंतरही राष्ट्रवादीने दिलेली ही प्रतिक्रिया उपहासात्मक असल्याचं स्पष्ट होत आहे.


राहुल गांधी यांचे पंतप्रधान बनण्याचे स्पष्ट संकेत


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 2019 लोकसभा निवडणूक जिंकलो तर पंतप्रधान होईन, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी २०१९ निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का? असा प्रश्न विचारला यावर राहुल गांधींनी होकारार्थी उत्तर दिलं. 


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. मात्र राहुल गांधींनी प्रथमच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं सांगितल्याने २०१९ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी रंगण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी  भाजप अध्यक्ष  अमित शाह यांच्याही जोरदार टीकास्त्र सोडलं. अमित शाह यांच्यावर  खूनाचा आरोप असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.तसंच त्यांनी भाजपच्या कर्नाटकातल्या  मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरुनही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.