ऊस उत्पादकांसाठी पावलं उचला, शरद पवार यांचं मोदींना पत्र
आर्थिक संकटात सापडल्यानं ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत.
नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडल्यानं ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचला, असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. सध्या देशभरात ऊस उत्पदकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि निराशा आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीनं उपायोजना करण्याची गरज असल्याचं या पत्रात पवारांनी म्हटलंय. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाला शेतकऱ्यांमधला रोष कारणीभूत ठरल्याचं मानलं जातंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पावलं उचला, असा सल्ला पवारांनी मोदींनी पत्रामधून दिलाय.
शरद पवार यांनी उस उत्पादक आणि साखर कारखानदारांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं हे दुसरं पत्र आहे. गेल्या वर्षीही शरद पवार यांनी पंतप्रधानांना अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं. साखरेचे भाव कोसळले आहेत, आणि साखरेची निर्यात होत नसल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. हे साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत नाहीत. एफआरपीची रक्कम थकलेली आहे, असं शरद पवार यांनी या पत्रात लिहिलं आहे.
या सगळ्या अडचणींवर शरद पवार यांनी उपाय सुचवले आहेत. तसंच हे कशामुळे घडतंय याची कारणंही त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात सांगितली आहेत. साखरेचा किमान विक्री दर २९ रुपयांवरून ३४ रुपये करावा. किमान विक्री दरामध्ये वाढ केली तर कारखानदारांच्या हातात जास्त पैसे येतील. हा उपाय तातडीनं करावा अशी मागणी पवार यांनी केली आहे. याचबरोबर साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करावेत. तसंच अर्थ खातं साखरेची निर्यात ढासळण्याला कसं जबाबदार आहे, असा आरोपही शरद पवार यांनी पत्रात केला आहे.
७० लाख क्विंटल साखर निर्यातीचं उद्दीष्ट अर्थ खात्यानं ठेवलं होतं, पण फक्त १५ लाख टन साखरच निर्यात झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा देशात पडून आहे. निर्यातीला अनुदान देऊन हा साठा बाहेर काढावा, अशी विनंती शरद पवार यांनी मोदींना केली आहे. केंद्र सरकारनं तातडीनं याबाबत पावलं उचलली नाहीत, तर उस उत्पादक शेतकरीही आत्महत्या करू शकतो, अशी भीती शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.