जनतेने भाजपच्या मग्रुरीला नाकारलं- शरद पवार
या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय.
नवी दिल्ली: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपला फटकारले. हिवाळी अधिवेशनासाठी संसदेत आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांना निकालांविषयी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा पवार यांनी म्हटले की, हे निकाल हेच दाखवतात की, जनता कोणाचीही मग्रुरी सहन करायला नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेले कल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या प्रमुख राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय.
तत्पूर्वी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूरही काहीसा मवाळ दिसला. मोदी यांनी निकालांविषयी कोणतेच भाष्य केले नाही. मात्र, त्यांनी विरोधी पक्षांना संसदेचे कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आजच्या निकालांनंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. काँग्रेसने सर्व ठिकाणी जोरदार कमबॅक केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे.