IndiaVsChina: `भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली; शेजारी देशांवर लक्ष ठेवा`
दक्षिण चीनच्या समुद्रातील चिनी नौदलाची उपस्थिती हा चिंतेचा विषय
मुंबई: लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. भारताने श्रीलंका आणि नेपाळमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तसेच चीनच्या घुसखोरीवरही नजर असली पाहिजे. भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली सुरु आहेत. हा प्रदेश चीन सर्व बाजूंनी घेरत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातील चिनी नौदलाची उपस्थिती हा चिंतेचा विषय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये लडाखमधील पँगाँग सरोवराच्या परिसरात चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत अनेकदा घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. यामुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गुरुवारी माजी हवाईदलप्रमुख भुषण गोखले, माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. यावेळी माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे नेतेदेखील उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी भारत-चीनमधील सद्यस्थितीवर आपापली मते मांडली.
एअर मार्शल भुषण गोखले यांनी भारताने सायबर, माहिती व तंत्रज्ञान, प्रतिमानिर्मिती आणि आर्थिक अशाप्रकारच्या आधुनिक पद्धतीच्या समांतर युद्ध तंत्रावरही भर देण्याची गरज व्यक्त केली. तर विजय गोखले यांनी भारत-चीन यांच्यातील सीमावादाचा इतिहास आम्हाला समजावून सांगितला. गेल्या काही महिन्यांत भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकींविषयीही त्यांनी मत मांडले, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने पँगाँग सरोवराच्या परिसरातील भारतीय हद्द ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर चेपुझी आणि चुमार परिसरातही चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते.