शरद यादवांची पक्षातून हकालपट्टी शक्यता
संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाटणा : संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरातमध्ये मंगळवारी झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींचे पडसाद बिहारमध्ये उमटताना दिसत आहेत.
गुजरातमध्ये पक्षाचा एकमेव आमदार असला, तरी त्याच्या मतामुळे काँग्रेसचे अहमद पटेल यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाला. त्यांना मत देणारे छोटू वसावा हे शरद यादवांचे निकटवर्ती मानले जातात. इतकंच नव्हे, तर पटेल यांनी ट्विटरवरून शरद यादवांचे आभारही मानलेत. त्यामुळे आगीत आणखी तेल ओतलं गेलं आहे.
भाजपाशी मैत्री ताजी असताना हा बिहारचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमारांना मोठा दणका मानला जात आहे. त्यामुळे आता नितीश कुमार यादवांवर कारवाईच्या तयारीत असल्याचं समजतंय. आज शरद यादव पाटण्यात येत आहेत.
संवाद यात्रेच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. पुढल्या तीन दिवस ते ७ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मात्र यादवांच्या कार्यक्रमाशी पक्षाचा संबंध नसल्याचं JDUचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ट नारायण सिंह यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे यादव आणि कुमार यांच्यातली दरी अधिक रुंदावल्याचं स्पष्ट झालं आहे.