TATA Motors ची वाटणी? गुंतवणुकदारांवर कसा होणार परिणाम?
TATA Motors : भारतीय उद्योग जगतामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणाऱ्या टाटा मोटर्स संदर्भातील महत्त्वाची बातमी. तुम्हीही इथं गुंतवणूक केली आहे का?
TATA Motors Share News : भारतीय उद्योग जगतामध्ये टाटा मोटर्स हे नाव अतिशय मानानं घेतलं जातं. गेल्या कैक वर्षांपासून जागतिक स्तरावरही आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध करणाऱ्या या उद्योग समुहानं आतापर्यंत या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. रतन टाटा यांचं भरीव योगदान आणि संस्थेप्रती काम केलेल्या प्रत्येकाची मेहनत या बळावर कंपनीनं आपलं स्थान अबाधित ठेवलं. इथं शेअर बाजाराच्या वर्तुळातही टाटा मोटर्सची भलतीच चलती. याच TATA Motors संदर्भातील एक महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे.
संस्थेकडूनच सोमवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार वरिष्ठ संचालक मंडळ अर्थात कंपनीच्या बोर्ड ऑफ डायकेक्टरकडून कंपनीला दोन वेगवेगळ्या विभागांध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. शेअर बाजारात या कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमर्शिअर वेहिकल बिझनेस आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीला एका विभागात ठेवलं जाईल. तर, पॅसेंजर वेहिकल, ईवी, जेएलआर सह इतर प्रवासी वाहन व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीला दुसऱ्या गटात गणलं जाणार आहे.
हेसुद्धा वाचा : HDFC, Axis आणि ICICI नं बदले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?
एनसीएलटी व्यवस्था योजनेमार्फत हे विभाजन लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, या वाटणीनंतर टाटा मोटर्स लिमिटेडच्या सर्व शेअर धारकांकडे दोन्ही लिस्टेड कंपन्यांची समसमान भागिदारी असेल. समुहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या एन. चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या काही वर्षांपासून आतापर्यंत कंपनीनं अनेक महत्त्वाचे आणि प्रभावी बदल करत यश संपादन केलं. इथून पुढंही कंपनी मोठी लक्ष्य निर्धारित करत त्या संधींचं सोनं करण्याकडे अधिक भर देईल.'
डीमर्जरचा नेमका फायदा काय?
टाटा मोटर्सच्या अध्यक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या डिमर्जरचा फायदा कर्मचाऱ्यांची प्रगती आणि शेअरधारकांना उत्तम मूल्य मिळवून देण्यासाठी होणार आहे. हे डिमर्जर आता शेअरधारक, कर्जदाता आणि नियामकांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असून, त्यासाठी साधारण 12 ते 15 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, या प्रक्रियेचा गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होणार नाही अशी हमी कंपनीच्या वतीनं देण्यात आली आहे.
शेअर्समध्ये मोठ्या हालचाली
टाटा समुहाच्या टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली पाहा.ला मिळत असून या डिमर्जरनंतर आता दोन गटांमधील शेअरधारकांना समप्रमाणात शेअर मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील वर्षी 125 टक्के परतावा देणारा हा ऑटो शेअर येत्या काळात नव्यानं वेग धरू शकतो.