पंतप्रधान मोदी पिंडीवरचे विंचू, थरुर यांचं वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेस नेते शशी थरुर हे कधी आपल्या इंग्रजीमुळे तर कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात.
बंगळुरू : काँग्रेस नेते शशी थरुर हे कधी आपल्या इंग्रजीमुळे तर कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ या आपल्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या थरुर यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारुही शकत नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका व्यक्तीनं पत्रकाराला सांगितल्याचं थरुर म्हणाले.
२०१२ सालच्या कॅरव्हान मासिकाचा दाखला थरुर यांनी दिला. या मासिकामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर 'एम्परर अनक्राऊन्ड' या मथळ्याखाली ७ पानांची बातमी छापण्यात आली होती. या बातमीचा शेवट आरएसएस नेत्याच्या त्या वक्तव्यावरून झाला होता.
भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
शशी थरुर यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. तसंच शंकराचा अपमान केल्यामुळे राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे.
राहुल गांधी स्वत:ला शिवभक्त समजतात. पण त्यांचा एक नेता शंकराबद्दल असं वक्तव्य करतो, असं रवीशंकर प्रसाद म्हणाले.