तिरुवअनंतरपूरम :  २०१८च्या ऑगस्ट महिन्यात भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर असणाऱ्या केरळ राज्यात पूराने हाहाकार माजला होता. जवळपास संपूर्ण राज्य हे पूराच्या पाण्याखाली गेलं होतं. जीवीत, वित्तत हानी आणि आयुष्याला मिळालेल्या या भयावह वळणातून केरळवासियांना सावरण्यासाठी अनेकांनीच हात पुढे केले. या साऱ्यामध्ये स्थानिक मासेमार वर्गाचा मोलाचा वाटा होता. आपल्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असणाऱ्या मासेमारीच्या होड्या त्यांनी मदतीसाठी म्हणून या पुराच्या पाण्यात उतरवल्या आणि शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासेमारांचं केरळच्या बचाव कार्यात असणारं हेच योगदान पाहता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांचं नाव एका अत्यंत महत्त्वाच्या पुरस्कारासाठी पुढे केलं आहे. एक पत्रक लिहित सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याविषयीची विस्तृत माहिती दिली.  'अतिशय गरजेच्या आणि अडचणीच्या वेळी केरळ्या मच्छिमारांनी कोणत्याही संकटाची तमा न बाळगता, स्वत:चा जीव धोक्यात टाकत त्यांच्या होड्यांच्या सहाय्याने पूरग्रस्तांची मदत केली', असं त्यांनी या पत्रकात म्हटलं. 


वातावरणात होणारे अपेक्षित बदल आणि एकंदरच मासेमांरांनी ज्या पद्धतीने हा प्रसंग हाताळला यासाठी त्यांनी प्रचंड गरज होती ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. थरुर यांनी केलेली ही मागणी आणि केरळच्या मासेमारांचं योगदान पाहता आता खरंच त्यांच्या नावे नोबेल दिला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला पूर य़ा साऱ्यामुळे केरळ राज्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. राज्याच्या सखल भागांमध्ये पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं. राज्यात ओढावलेलं हेच संकट पाहता केरळमध्ये असणाऱ्या मासेमारांच्या एका मोठ्या वर्गाने आपली जबाबदारी निभावत केरळवासिांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यास मदत केली होती. त्यांच्या या कामाची सर्वच स्तरांतून प्रशंसा झाली. शिवाय केरळ राज्यसरकारकडूनही त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली होती. आता थरूर यांच्या विनंतीपर मागणीकडे पाहता खरंच त्याचा विचार केला गेला तर मासेमारांच्या कामाची ही एक  पोचपावतीच असणार आहे.