जमशेदपूर  : फेसबुकवर टाकलेली पोस्ट हे आपलं वैयक्तिक मत असलं, तरी ते कुणाला किती पचेल किंवा कुणाची जिव्हारी लागेल, अथवा ते तेथील कायद्यात बसते किंवा नाही, याचा विचार करूनच केलेली बरी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण एका महिलेने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे तिची नोकरी गेली आहे. जमशेदपूर येथील ग्रॅज्युएट स्कूल कॉलेजच्या एका प्राध्यापिकेला बीफ विषयी पोस्ट टाकणं महागात पडलं आहे. या प्रकरणी कॉलेजच्या व्यवस्थापनानं पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीचं समाधानकारक उत्तर न देता आल्यानं संबंधित प्राध्यापिकेला नोकरी गमवावी लागली आहे.


प्रा. हंसदा यांनी मे महिन्यात  'मला मित्रांसाठी बीफ पार्टीचं आयोजन करायचं आहे' अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. सरकारनं गोहत्येवर बंदी आणूनही हंसदा यांनी बीफ पार्टीचं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि उजव्या विचाराच्या संघटनाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. 


तसंच, प्राध्यापक हंसदा यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर कॉलेजकडून त्यांना नोटीस बजावून या पोस्टबद्दल स्पष्टीकरण मागवण्यात आलं  होतं. पण तिच्या उत्तरानं कॉलेजचं समाधान झालं नाही. त्यामुळं त्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


प्रा.हंसदा यांनी कॉलेज व्यवस्थापनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.