महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश दिल्याविरोधात शिवसेनेकडून संपाची हाक
शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना मासिकपाळी दरम्यान प्रवेशबंदी होती.
केरळ: शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश दिल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने केरळ बंदची हाक दिली आहे. त्यानुसार येत्या १ ऑक्टोबरला राज्यात १२ तासांचा संप पाळण्यात येईल, अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. आतापर्यंत शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना मासिकपाळी दरम्यान प्रवेशबंदी होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने बहुमताने मंदिरात महिलांना प्रवेश नाकारता येणार नसल्याचे सांगितले.
भक्ती ही लिंगभेदाच्या चौकटीत अडकवून ठेवता येत नाही. अयप्पा हे हिंदू होते, त्यांच्या भक्तांनी स्वत:चा वेगळा धर्म निर्माण करू नये. देहाच्या नियमांनी देवाचे नियम ठरवले जाऊ शकत नाहीत.
सर्वच भक्तांना मंदिरात जाण्याचा आणि पूजेचा अधिकार आहे. जर पुरुष मंदिरात जाऊ शकतात तर महिलांनाही पूजेचा अधिकार आहे. महिलांना मंदिरातील पूजा करण्यापासून रोखणं हा महिलांचा एकप्रकारे अपमानच आहे.
एकीकडे आपण महिलांची पूजा करतो आणि दुसरीकडे त्यांच्यावर पूजेचीही बंदी घालतो. महिला पुरुषांहून कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. दुर्बल असल्याने महिला व्रत ठेवतात असे नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते.