आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध
पहा काय म्हणाले खा. विनायक राऊत
नवी दिल्ली : एकेकाळी तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील सध्या सुरू असलेलं साप आणि मुंगुसाचं वैर काही केल्या संपत नाहीय.
राज्यात भाजपचे विरोधी पक्षनेते, आमदार शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हल्लाबोल करत आहेत तर तिकडे दिल्लीत सत्तेत असलेल्या भाजपवर शिवसेनेचे खासदार टीका करत आहेत.
केंद्र सरकारने काल संसदेत लोकसभेत आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करण्याचे विधेयक मांडले आणि दुपारी ते मंजूर करून घेतले. या विधेयकाला काल एमआयएमचे खासदार ओवेसी यांनी विरोध केला होता. त्या पाठोपाठ आता शिवसेनेनेही या विधेयकाला विरोध केला आहे.
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खा. विनायक राऊत यांनी हे विधेयक आणण्यामागे सरकारचा कुटील डाव असल्याची टीका केली आहे.
ज्या घाईगडबडीत काल हे विधेयक आणले गेले. त्यामागे सरकारची भूमिका समजून येत नाही. केंद्र सरकार इतका मोठा निर्णय घेत असताना त्यावर संसदेत चर्चा होण्याची आवश्यकता होती. यावर जनमत घेण्याची आवश्यकता होती. मात्र सरकारनं ते केले नाही.