नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या रोज चिखलफेक सुरु आहे, यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इतर प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे, त्यामुळे यातून प्रमुख माणसाने मार्ग काढला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 


महाराष्ट्रात रोज चिखलफेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या संत सज्जन साधुंचं राजकारण राहिलेलं नाही, निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण कोणत्या थराला गेलं आहे, आपण हे पाहतोय, महाराष्ट्रात सध्या रोज चिखलफेक सुरु आहे, यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इतर प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे, ज्यांनी याची सुरुवात केली ते आता पळून जात आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपचं नाव न घेता केली आहे. 


प्रमुख माणसाने लक्ष घातलं पाहिजे


नवाब मलिक यांचे काही आरोप जोरदार आहेत, ते राजकीय आहेत की व्यक्तिगत ते मला म्हणायचं नाही, पण असे आरोप करुन महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याची परंपरा ज्यांनी सुरुवात केली, त्यांच्यावर आता पळता भुईथोडी झाली आहे. पण ही महाराष्ट्राची परंपरा नाही, कुणीतरी प्रमुख माणसाने यात लक्ष्य महाराष्ट्रात लक्ष्य घातलं पाहिजे आणि ही चिखलफेक थांबली पाहिजे. 


रोज सकाळी आरोप-प्रत्यारोप


एसटीचा प्रश्न सर्वांनी एकत्र येऊन सोडवला पाहिजे, ते न करता रोज सकाळी आरोप-प्रत्यारोप होत आहेत.  कुठेतरी याला मर्यादा यायला हव्यात. नवाब मलिक हे सर्व एका चिडीतून करतायत हे मला मान्य आहे, त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंग आणि संकट आलं होतं, तो आम्ही जवळून पाहिलेला आहे त्यामुळे यातून प्रमुख माणसाने मार्ग काढला पाहिजे. मला वाटतं सध्या प्रमुख माणूस म्हणून राज्यात मुख्यमंत्री आहेत किंवा शरद पवार आहेत, ज्यांना महाराष्ट्राच्या हिताची आणि प्रतिष्ठेची चिंता आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


महाराष्ट्रात कसलं राजकारण?


देशातल्या लोकांना कालपर्यंत असं वाटत होतं, की महाराष्ट्रात फक्त चरस, अफू, गांजाचंच पीक निघतं, रोज बातम्या येतायत. आणि आज असं वाटायला लागलं आहे, महाराष्ट्रात रोज गुंड, बदमाश, दाऊदची माणसं यांच्याशी संबंध असलेलं राजकारण निर्माण होतंय. 


भाजपकडे माणसं स्वच्छ करण्याचं वॉशिंग मशीन


कोणाबरोबर काय फोटो असतील हा पुरुवा होऊ शकत नाही, रियाज भाटीचे फोटो नरेंद्र मोदींबरोबरसुद्धा आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर काही फोटो प्रसिद्ध झाले होते, कोणकोणाविरुद्ध कधी उभं राहिल, कोणकोणाविरुद्ध फोटो काढेल. भाजपकडे जी वॉशिंगमशिन आहे त्यामधलं घातलं की सर्व स्वच्छ होतात, हे सर्व गुंड, बदमाश, दाऊदचा माणूस, छोटा शकीलचा माणूस, आमच्याकडे असला की याचा माणूस त्याचा माणूस आणि त्यांच्या वॉशिंगमशीनमध्ये गेला की एकदम चकचकीत शुभ्र होतो, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.