स्वातंत्र्यवीर सावरकरांना `भारतरत्न` का नाही ? - संजय राऊत
भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा असा टोला
मुंबई : वीर सावरकर आमचे मार्गदर्शक आहेत. भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे. केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
सावरकरांच्या सन्मानासाठी शिवसेना जागरुक असल्याचे ते म्हणाले. सावरकरांवर ज्यांनी आक्षेपार्ह टीका केली त्यांना आम्ही उत्तर दिलंय असे देखील संजय राऊत म्हणाले. सावरकरांनी देशाचे नेतृत्व केले. अंदमानमध्ये तुरुंगवास भोगला. अशा सावरकरांबाबतीत केंद्र सरकार शांत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपने सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकावे असा टोला त्यांनी लगावला होता. या पार्श्वभुमीवर पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत बोलत होते.
कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी जवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ५० जणांच्या उपस्थित घेण्यात आला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दरम्यानं स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपकडून शिवसेनेवर टीका होत होती. या टीकेला संजय राऊतांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
यावेळी मराठा आरक्षण संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे राऊतांनी स्पष्ट केले.