मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 2016 मध्ये लागू करण्यात आलेल्या नोटबंदीवर आरबीआयचा ताजा अहवाल धक्कादायक असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी नोटबंदीवर भारतीय रिझर्व्ह बँकेंच्या या अहवालावर संसदेत चर्चेची मागणी केलीय. नोटबंदी दरम्यान बँकांच्या रांगेत अनेक जणांनी आपले प्राण गमावले हा सर्वात मोठा गुन्हा आहे, असंही त्यांनी म्हटलंय.



केंद्र सरकारनं 500 आणि हजारच्या बंद केलेल्या 99.3 टक्के नोटा परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिलीये. केवळ शून्य पूर्णांक 7 टक्केच नोटा चलनातून बाद झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या या मोठ्या निर्णयाच्या उपलब्धतेबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागलीये. रिझर्व्ह बँकेनं 2017-18 चा वार्षिक अहवाल जाहीर केला. यामध्ये ही बाब उघड झाल्यानंतर काँग्रेसला मोदी सरकारवर टीकेची आयती संधी मिळालीये. त्याच वेळी नोटाबंदीचं उद्दिष्ट सफल झाल्याचा दावा केंद्र सरकारनं केलाय.