नवी दिल्ली : रविवारी रामनवमी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. बिहारमधील औरंगाबादमध्येही रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान हिंसा झाली. ही हिंसा इतकी वाढली की, सोमवारी प्रशासनाला कर्फ्यू लावावा लागला. केवळ कर्फ्यूच लावला नाही तर, दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बिहारमधील औरंगाबादमध्ये रविवारी रामनवमी निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. याच दरम्यान काही अज्ञातांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. दगडफेकीनंतर संतप्त जमावानेही तोडफोड आणि जाळपोळ करण्यास सुरुवात केली.



याच दरम्यान दंगलखोरांनी काही दुकांनांना आग लावली आणि तोडफोडही केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.



या हिंसेनंतर सोमवारी संपूर्ण शहराला पोलीस छावणीचं स्वरुप आलं होतं. पोलिसांनी शहरात कर्फ्यू लावला असून दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच आरोपींना अटक करण्याचंही काम सुरु आहे.


हिंसेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दंगलखोरांना अटक करण्याची कारवाई सुरु आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.