नवी दिल्ली : काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला १८ तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांची एक मुलाखत एका खासगी गुजराती वाहिनीवर आज झळकली. या मुलाखतीमध्ये गुजरात निवडणुकांबाबत भाष्य असल्यामुळे हा सकृतदर्शनी आचारसंहितेचा भंग असल्याचा ठपका आयोगानं ठेवलाय.


याबाबत कारवाई का करू नये अशी विचारणा गांधी यांना नोटिसीद्वारे केलीये. तसंच खासगी वाहिन्यांनी गांधी यांची मुलाखत प्रदर्शित करू नये, असे आदेश दिलेत. यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय.


काँग्रेसचं प्रत्युत्तर


निवडणूक आयोगाच्या या कारवाईवरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीवेळी अशाप्रकारे मुलाखती दिल्याचं रणदीप सुरजेवाला म्हणाले.


अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ८ डिसेंबरला भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मोदींनी ९ डिसेंबरला ४ सभा घेतल्या. अमित शहांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज दोन पत्रकार परिषदा घेतल्या, पण यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं ट्विट रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.