सुस्मिता भदाणे, मुंबई : देशाच्या राजकारणात सध्या चौकीदार हा शब्द खूप गाजतोय, एकाबाजूला चौकीदार शब्द हिनवण्यासाठी, तर दुसरीकडे त्याला उत्तर म्हणून स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी वापरला जातो आहे. पण खरोखर जे चौकीदाराचं म्हणजे सुरक्षा रक्षकांचं काम करतात, त्यांच्यावर कामाचा मोबदला आणि कामाची वेळ याबाबत प्रचंड अन्याय होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द देशाचे पंतप्रधान जरी मै भी चौकीदार म्हणत असले तरी खऱ्याखुऱ्या चौकीदारांची स्थिती मात्र फारशी बरी नाही. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्येही अतिशय कमी पगारावर हे चौकीदार काम करतात. अनेकांचा पगार ८-१० हजारांच्याही खाली असतात. साप्ताहिक सुट्या तर नाहीत, उलट कामाची वेळ १२ तास आहे. 


एटीएम, कॉर्पोरेट ऑफिस, महत्वाच्या सरकारी, निम सरकारी इमारती या ठिकाणी सुरक्षा देऊन, ते आपलं कर्तव्य बजावत असतात. पण काही खासगी कंपन्यांकडून त्यांची नेमणूक होते. यात कामगार पुरवणाऱ्या कंपन्यांना अधिक फायदा घेतायत, मात्र दुसरीकडे याच कंपन्या सुरक्षा रक्षकांना कमी पगारात अधिक राबवून शोषण करत आहेत.


देशातील हे चौकीदार असंघटीत नोकरदार आहे, त्याचाच मोठ्या प्रमाणात फायदा घेतला जातोय. किमान वेतन अधिनियम 1948, नुसार कामकारांच्या कामाची वेळ, आणि सुटीचे दिवस ठरले आहेत आणि किमान वेतन ठरलंय. तरी या कामगारांना महिन्याला ४ सुट्या देखील नाहीत, त्या घेतल्या तर पैसे कापले जातात. एवढा अन्याय या खऱ्याखुऱ्या चौकीदारांवर होत आहे.


राजकीय पक्ष आरोपप्रत्यारोप आणि एकमेकांवर टीका करताना चौकीदार शब्दाचा आपल्या सोयीप्रमाणे वापर करत आहेत. भाजपा आणि काँग्रेसनं 'चौकीदार' हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. मात्र आपलं गावं-घर सोडून मुंबईत येऊन राहणाऱ्या या चौकीदारांची स्थिती सुधारण्यासाठी कुणी काही करणार का, हा प्रश्न आहे.