हे कसले रेस्क्यू ऑपरेशन? सहाव्या दिवशी सिल्क्यारा बोगद्यातून समोर आली धक्कादायक माहिती
Uttarkashi Silkyara Tunnel Rescue : गेल्या सहा दिवसांपासून यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोसळलेल्या बांधकामाधीन बोगद्यातील 22 मीटरचा ढिगारा बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडच्या उत्तरकाशी (Uttarkashi) येथील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) भाग कोसल्याने अनेक मजूर अडकून पडल्याने देशवासिय चिंतेत आहेत. ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्याराहून डंडालगावपर्यंत जाणाऱ्या या निर्माणाधीन बोगद्याचा तब्बल 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला होता. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडवण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरूच आहे. यमुनोत्री महामार्गावरील बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची सरकारची योजना अद्याप पूर्णपणे यशस्वी झालेली नाही. सिल्क्यारा बोगद्याच्या बांधकाम आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या बाबी सातत्याने समोर येत आहेत. अशातच आता सहाव्या दिवशी बोगद्यात 40 नव्हे तर 41 कामगार अडकल्याचे बांधकाम कंपनीला समजलं आहे. अधिकृतरित्या जाहीर झालेल्या मजुरांच्या यादीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
दीपक कुमार असे या 41 व्या मजुराचे नाव असल्याचे यादीतून समोर आलं आहे. दीपक कुमार हा बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी आहे. दीपकसह बोगद्यात अडकलेल्या बिहारमधील कामगारांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दुसरीकडे, ढिगारा खोदकाम करण्यासाठी नवे यंत्रे बसवण्यात आली आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे.
सिल्क्यारा बोगद्यात पाईप टनल बांधून आत अडकलेल्या कामगारांपर्यंत लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नांना शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता ऑजर मशीनमध्ये ( American auger machine) तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा धक्का बसला होता. मशिनच्या सहाय्याने बोगद्याच्या आत सुमारे 22 मीटर एस्केप बोगदा तयार करण्यात आला तर सुमारे 40 मीटरचे काम बाकी आहे. या मशिनच्या दुरुस्तीसोबतच खबरदारी म्हणून आणखी एक मशीन इंदूरहून आणण्यात येत आहे. याशिवाय प्लॅन सी अंतर्गत बोगद्याच्या वरून ड्रिलिंग करून कामगारांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो.
सिल्क्यारा बोगद्याच्या आत अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये बचाव पथकाकडून विविध मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रत्येकी 900 मिमी व्यासाचे आणि 6 मीटर लांबीचे पाच पाईप्स आहेत, जे आता पूर्णपणे ढिगाऱ्यामध्ये टाकण्यात आले आहेत. याद्वारे आतमध्ये अडकलेल्या कामगारांपर्यंत मदत पोहोचवली जात आहे. दरम्यान, बोगद्यात पाचवी ट्यूब टाकत असताना, मशीनच्या बाजूला ढिगारा पडू लागला होता. त्यानंतर बचाव करणाऱ्या मजुरांना तात्काळ बोगद्यातून बाहेर काढण्यात आले आणि सुमारे तासभर हे ऑपरेशन थांबवण्यात आले.
दुसरीकडे, बोगद्याच्या बाधित भागात सतत मातीचा ढिगारा खाली पडत आहे. ढिगाऱ्यापासून वाचवण्यासाठी ऑगर मशीनही मागे खेचले गेले होते. त्यामुळे याला आत पोहोचण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा काम सुरु करण्यात आले. 60 मीटर ढिगाऱ्याच्या मागे अडकलेल्या कामगारांना पाईपद्वारे आवश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे आणि त्यांच्याशी सतत संवाद सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.