मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते एस.एम. कृष्णा यांचे जावई आणि 'सीसीडी' अर्थात 'कॅफे कॉफी डे'चे मालक, संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता आहेत. 'द न्यूज मिनिट'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पोलिसांकड़ून त्यांच्या बेपत्ता असण्याची माहिती मिळाली. त्यांचं बेपत्ता होण्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट असलं तरीही प्राथमिक पातळीवर आत्महत्येचा संशय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांमार्फत समोर आलेल्या माहितीनुसार मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या पुलाजवळील परिसरात सिद्धार्थ त्यांच्या कारमधून उतरले. पण, जवळपास तासाभरानंतरही ते कारमध्ये परत आलेच नाहीत, हे पाहता कारचालक काहीसा गोंधळला आणि त्याने सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांना त्यासंबंधीची माहिती दिली. दक्षिण कन्नड पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासूनच त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 




कारचालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते सोमवारी रात्री बंगळुरूहून मंगळुरूच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरुन जात असताना उल्लाल येथे असणाऱ्या नेत्रावती नदीच्या पुलावर चालकाला कार थांबवण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी ते फोनवरच बोलत होते. आपण लगेचच परत येऊ असं सांगत ते कारमधून उतरले आणि चालकाने त्याचवेळी त्यांना शेवटचं पाहिलं, अशी माहिती मंगळुरूचे आयुक्त संदीप पाचील यांनी टीएनएमला दिली. 



एका स्थानिक संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थ यांच्या कारमध्ये आणखी दोन इसमही होते. जे पंपवेल सर्कलपाशी उतरले. या संपूर्ण तपास प्रक्रियेत नेत्रावती नदीतही सिद्धार्थ यांचा शोध घेण्यासाठी नौकादल पाठवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी एस.एम. कृष्णा  यांच्या निवासस्थानी धाव घेतली.