Smriti Irani Tiranga Yatra Video : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी स्कूटी चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार याही स्कूटीवर होत्या. स्मृती इराणी यांनी भारती पवार यांना त्यांच्या कार्यालयापर्यंत लिफ्ट दिली. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत इराणी यांनी लिहिले की, 'तिरंगा यात्रेने दिवसाची अप्रतिम सुरुवात केल्यानंतर डॉ. भारती पवार यांना कार्यालयात सोडले'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कुटीने तिरंगा यात्रा


व्हिडिओमध्ये स्मृती इराणी लाल रंगाची साडी परिधान करुन स्कुटी चालवताना दिसत आहेत. आरोग्य राज्यमंत्री भारती पवार स्कूटीच्या मागे बसून त्यांच्या हातात राष्ट्रध्वज होता. केंद्र सरकार आणि भाजप ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवून स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहेत. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावरून खासदारांच्या तिरंगा बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.


काय म्हणाल्या स्मृती इराणी?


रॅलीदरम्यान स्मृती इराणी म्हणाल्या की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील प्रत्येक नागरिक आनंद साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असा आहे की, पुढील २५ वर्षे संकल्पांनी भरलेली, कर्तव्यांनी भरलेली असावीत आणि प्रत्येक भारतीयाने अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. तिरंग्याची शक्ती 130 कोटी भारतीयांना एकत्र करण्याची आहे. आज सर्वजण एकजुटीने तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.



अनुराग ठाकूरही होते उपस्थित


या मोहिमेत अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि विविध पक्षांचे नेते सहभागी झाल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तिरंगा यात्रेत विरोधी पक्षांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी माझी इच्छा होती, पण त्यांनी तसे केले नाही. आपण सर्वजण भारताला एकसंध ठेवू, भारताला पुढे नेऊ आणि भारताला बलशाली बनवू, हा संदेश येणाऱ्या पिढ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.