नवी दिल्ली : एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नायडूंनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारलाय. त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त भार वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर नागरी विकास मंत्रालयाचा भार नरेंद्र तोमर यांना देण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतीपदासाठी उत्तरेतल्या राज्याला संधी दिल्यानंतर नायडूंच्या निमित्तानं भाजपनं दक्षिणेतल्या राज्याला संधी दिली आहे. नायडूंकडे केंद्रीय नगरविकास खात्याचा कार्यभार होता. नायडूंच्या निमित्तानं भाजपनं अनुभवी राजकारणी मैदानात उतरवलाय. 


उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेत काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळं सरकारला येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी भाजपला अनुभवी राजकारणी उमेदवार हवा होता. आता भाजपनं नाय़डूंच्या रूपानं यूपएला आव्हान दिलंय. 


नायडू आणि यूपीएचे उमेदवार गोपाल गांधी यांच्यात लढत रंगणार आहे. तेही दुपारी पावणे बाराच्या सुमारास उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याआधी ज्या पक्षांनी पाठिंबा दिलाय, त्यांचे आभार गांधींनी आभार व्यक्त केलेत.