मुंबई : प्रेम आणि एखाद्या गोष्टीप्रती असणाऱी आत्मियता याच्या आड कधीच वयाचा आकडा येता कामा नये, असं नेहमीच म्हणतात. सोशल मीडियावर सध्या अशीच एक जोडी एका अनोख्या अंदाजात #Couple_Goals देत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक व्हि़डिओ प्रचंड चर्चेत आला होता. ज्यामध्ये ते 'लॅम्बर्गिनी' या गाण्यावर ठेका धरताना दिसत होते. हीच पंजाबी जोडी पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकत आहे. यावेळी निमित्त आहे ते म्हणजे या व्हिडिओतील काकूंच्या वाढदिवसाचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिताना सिंग या त्यांच्या मुलीने आपल्या आईला शुभेच्छा देत खास दिवसाचं औचित्य सा३धत एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये कोणा एका समारंभात सर्वांच्याच आवडीची ही जोडी पुन्हा एकदा लॅम्बर्गिनी या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. त्यांची ही अफलातून कला पाहता तरुणाईलाही लाजवेल असाच हा उत्साह आहे, हे नाकारता येणार नाही. 



अगदी सहजपणे आणि तितक्याच शिताफीने हे काका- काकू कपल डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर असणारे भाव पाहता हा व्हिडिओ तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आणेल हे नक्की. मुख्य म्हणजे अमुक एका प्रकारचं नृत्य करण्यासाठी ठराविक प्रकारच्याच वेशभूषेची गरज असते, असं म्हणणाऱ्यांनाही ही जोडी अपवाद ठरत आहे. कारण, साडीतही या काकू ज्या सुरेख पद्धतीने आणि हसतमुखाने काकांची साथ देत नृत्य सादर करत आहेत ते पाहता क्या बात, अशीच उत्स्फूर्त दाद द्यावीशी वाटते.