नवी दिल्ली: काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना गळाला लावल्यानंतर आता भाजपकडून गुजरातमध्येही आमदारांची फोडाफोडी केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री काँग्रेसने आपल्या १४ आमदारांना जयपूरला हलवले आहे. त्यांना जयपूरच्या शिव विलास हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. येत्या २६ तारखेला राज्यसभेची निवडणूक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशचा निर्णय उद्या; राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश


यावेळी काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग होऊ शकते. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापलाथीनंतर हा धोका आणखीनच वाढला आहे. त्यामुळे गुजरातमधील काँग्रेसचे नेते कमालीचे सतर्क झाले आहेत. याविषयी काँग्रेस आमदार हिंमत सिंह पटेल यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटले की, आमच्या पक्षात सर्वकाही ठीक आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती असते. काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये येणे, हा रणनीतीचाच एक भाग असल्याचे पटेल यांनी सांगितले. 


सध्याच्या घडीला राजस्थान हे काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित राज्य मानले जात आहे. त्यामुळे राजकीय संकटावेळी काँग्रेसच्या आमदारांना राजस्थानमध्ये हलवण्यात येते. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील सत्तानाट्यावेळी काँग्रेस आमदारांनाही जयपूरमध्येच ठेवण्यात आले होते. 



येत्या २६ तारखेला राज्यसभेची निवडणूक होत आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांवर निवडणूक होणार आहे. गुजरात विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळेल. मात्र, भाजपकडून नरहरी अमीन यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. अमीन यांनी २०१२ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांकडून त्यांना क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आपल्या आमदारांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.