मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) 2009 मध्ये 'थ्री इडियट्स' (3 Idiots) या सिनेमात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या असामान्य शोधांनी प्रेक्षकांना चकित केले होते. मात्र, खऱ्या आयुष्यात अशा एका अवलियाने भारतीय सैन्यांसाठी सौर तंबू तयार केले आहेत. त्याचे नाव आहे सोनम वांगचुक. (Sonam Wangchuk) सोनम वांगचुक यांनी सौर गरम पाण्याचे सैन्य तंबू तयार केले आहेत जे एकावेळी भारतीय लष्कराच्या 10 जवानांना वापरता येतील आणि ते पूर्णपणे पोर्टेबल आहेत. ( Sonam Wangchuk, who inspired 3 Idiots' Phunsukh Wangdu, invents solar-heated military tents for Ladakh cold)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सौर तंबूबाबत सोनम वांगचुक यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हे तंबू लद्दाखच्या गलवान खोऱ्यात (Galvan Valley)  अति थंड हवामानात हे सौर तंबू वापरण्याच्या उद्देशाने आहे, असे म्हटले आहे. सोनम वांगचुक यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून या सौर तंबूचे फोटो शेअर केले आहेत. त्यात गलवान व्हॅलीमधील बाहेरचे आणि तंबूच्या आतील तापमान दर्शवताना ते दिसत आहेत. त्यांनी बनवलेला हा तंबू सौरऊर्जेवर चालणारा आहे.


प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांकडून सोनम वांगचुक यांचे कौतुक केले जात आहे. या तंबूचे वजन केवळ 30 किलो असून त्यात तापमान नियंत्रित करण्याची सोय आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचा हा सौरतंबू लडाखमध्येच तयार करण्यात आला आहे. 



या सौर तंबूत एकाचवेळी 10 जवान विश्रांती घेऊ शकतात. तंबूचा प्रत्येक पार्ट वेगळा करता येतो. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकते. लडाखमध्ये गस्तीवर असलेल्या जवानांना तिथल्या प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेणे सर्वात मोठे आव्हान असते. उणे अंशात पारा गेल्यावर त्यांच्या त्रासात आणखीनच भर पडते. त्यामुळे हे सौर तंबू उपयोगी पडणार आहेत.


तसेच हे सौर तंबू वायूप्रदूषणापासून बचाव करु शकतात. सैनिकांसाठी लडाख, गलवान खोरे येथे प्रचंड थंडी असते. तापमानही उणे असते. त्यामुळे उबदारपणा येण्यासाठी जवानांसाठी तंबूत कोरोसीन हीटर लावण्यात येतात. त्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या निर्माण होते. आता याला पर्याय म्हणून हे सौर तंबू उपयोगी ठरणार आहेत. हा अनोखा पर्याय वागचुक यांनी शोधून काढल्याने त्यांचे कौतुक होत आहे.