नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी
नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई : काँग्रेसने (Congress ) नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिद्धू यांची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धू यांनी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसकडून (Congress ) तसे नियुक्तीचे पत्र दिले असून ते प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Sonia Gandhi appoints Navjot Singh Sidhu as the President of the Punjab Pradesh Congress )
पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसकडून तसे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आता नवज्योतसिंह सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेतील. सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर चार कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले आहेत.
यामध्ये संगतसिंह गिलजियां, सुखविंदरसिंह डैनी, पवन गोयल आणि कुलजीतसिंह नागरा यांचा समावेश आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून काढण्यात आलेल्या पत्रकावर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, नवज्योतसिंह यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना कुलजीतसिंह नागरा यांना सिक्कीम, नागालँण्ड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
नवज्योतसिंह सिद्धू हे नाराज होते. त्यामुळे त्यांची नाराजी काँग्रसकडून दूर केली जाईल, अशी शक्यता होती. तसेच त्यांच्यावर पंजाब राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी चर्चा होती. आता त्यांना पंजाब प्रदेशचे अध्यक्षपद सोपविण्यात आल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारीच सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.