नवी दिल्ली : देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या विषयावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. संकटाच्या काळातसुद्धा आपले सरकार सतत किंमती वाढवत असते आणि त्यातून शेकडो कोटी रुपये कमवले आहेत. सरकारने त्वरित वाढलेले दर मागे घ्यावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया गांधींनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, लॉकडाऊन दरम्यान सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सुमारे 2.6 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. जेव्हा लोकं संकटात असतात, तेव्हा या मार्गाने किंमत वाढविणे त्यांना अधिक त्रासदायक ठरत आहे. अशा परिस्थितीत लोकांचे संकट दूर करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.


काँग्रेस अध्यक्षांनी लिहिले की, मला समजत नाही, की देशामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आणि लोकांना जगण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे, तर मग सरकार असे पैसे का वाढवत करत आहे. आज कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने कमी होत आहेत आणि सरकारने गेल्या 6 वर्षात सतत किंमत वाढविली आहे.


सोनिया गांधींनी लिहिले की, सरकारने गेल्या 6 वर्षात पेट्रोलवर 258 टक्के तर डिझेलवर 820 टक्क्यांनी उत्पादन शुल्क वाढविले आहे, ज्याने सुमारे 18 लाख कोटी रुपये कमाई केली आहे.


या वाढलेल्या किंमती त्वरित मागे घ्या आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे.


गेल्या दहा दिवसांपासून देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. मंगळवारी पेट्रोल 47 पैशांनी तर डिझेल 75 पैशांनी वाढले. यासह आता दिल्लीत पेट्रोलची किंमत 76.73 पैसे तर डिझेलची किंमत 74.62 पैसे झाली आहे.