नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर लोकसभेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधरी योग्य पद्धतीनं काश्मीर प्रश्नावर पक्षाची बाजू मांडण्यात असमर्थ ठरल्यानं सोनिया गांधी त्यांच्यावर नाराज आहेत. परंतु, त्यानंतर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीर मुद्यावर आपलं म्हणणं मांडलं तेव्हा त्यावर सोनिया गांधींना हायसं वाटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजपच्या म्हणण्यानुसार, काश्मीर हा अंतर्गत वाद आहे. पण या मुद्यावर संयुक्त राष्ट्रात १९४८ पासून लक्ष ठेवून आहे. मग केंद्र सरकार यावर कसं विधेयक आणू शकतं? भारताच्या एका पंतप्रधानाने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर शिमला करार केला, तर दुसऱ्या पंतप्रधानाने लाहोर दौरा केला. मग हा अंतर्गत मुद्दा कसा असू शकतो' असं वादग्रस्त वक्तव्य चौधरी यांनी लोकसभेत केलं. 


तर यानंतर, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लोकसभेत बोलताना 'हा संविधानाला त्रासदायक मुद्दा बनलाय. जम्मू-काश्मीर विधानसभेशी चर्चेशिवाय अनुच्छेद ३७० संपुष्टात आणला जाऊ शकत नाही. हे चुकीचं आहे. अनुच्छेद ३७० संपवून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे की अनुच्छेद ३७१ ही संपुष्टात आणला जाईल? तुम्ही जनतेसमोर काय उदाहरण मांडत आहात' असं म्हणत काँग्रेसची बाजू लोकसभेच्या माध्यमातून नजरेसमोर मांडली.


जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढत त्याला दोन केंद्रशासित राज्यामध्ये विभागण्यात आलं. परंतु, त्याच्या संविधानाचं काय होईल? हे संविधान पुसून टाकायलाही सरकार विधेयक आणणार का? सरकारनं या मुद्याच्या वेगवेगळ्या बाजुंवर विचार केलेला दिसत नाही, असंही त्यांनी म्हटलं. आज जूनागड, हैदराबाद, जम्मू-काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहेत तर ते केवळ नेहरूंमुळेच, हेही त्यांनी ठणकावून सांगितलं. 



यावर, 'अनुच्छेद ३७० हटवण्याच्याविरुद्ध आहे की सोबत हे अजूनही काँग्रेसनं स्पष्ट केलेलं नाही' असं अमित शाह यांनी म्हटलं. त्यावेळी 'मी अगोदरच स्पष्ट केलंय की विधानसभेशी चर्चा केल्याशिवाय तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही' असं थेट प्रत्यूत्तर मनीष तिवारी यांनी अमित शाहांना दिलं.