मुंबई : आज उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईतल्या 'शिवतीर्थ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचाही शपथविधी आज पार पडणार आहे. अवघे ४४ आमदार असलेल्या काँग्रेसला खातेवाटपात एक मंत्रीपद वाढून मिळालंय. काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदाऐवजी एक वाढीव कॅबिनेटपद मिळणार आहे. परंतु, आज होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मात्र अनुपस्थित असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीर्घ काळापासून सोनिया गांधी या प्रकृती अस्वास्थासोबत झगडत आहेत. त्यामुळे त्या आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या शपथविधी कार्यक्रमाला येणार नसल्याचं सांगण्यात येतंय.


परंतु, आपल्या शुभेच्छा पोहचतील याकडे मात्र सोनिया गांधी यांनी विशेष लक्ष दिलंय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे काँग्रेस आणि पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


तसंच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वत: दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यांना शपथविधी कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली होती.  



दरम्यान, महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात जाहीर करण्यात आलाय. यात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच एक रूपयात आरोग्य चाचणी आणि सामान्यांना १० रुपयात जेवणाचंही आश्वासन देण्यात आलंय. स्थानिकांसाठी ८० टक्के रोजगार राखीव ठेवण्यात येणार असल्याचंही आश्वासन किमान समान कार्यक्रमात देण्यात आलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच कॅबिनेटची पहिली बैठक घेण्यात येणार आहे. याच बैठकीतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आणखी काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.